नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामिण भागातून कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायींची सुटका करण्यात शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकास यश आले आहे. या कारवाईत चालकास बेड्या ठोकत सुमारे ४ लाख १० हजार रूपये किमतीचे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात वाहन चालक मालकासह तीन कसाईंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. जनावरे चारचाकीत कोंबून आणली जाणार असल्याची माहीती पथकाला मिळाली होती. त्यानुसार तवली फाटा भागात सापळा लावण्यात आला होता. न्यु नाशिक टोईंग सर्व्हीस येथे पेठकडून नाशिकच्या दिशेने येणारी एमएच १५ ईजी ३०५८ ही चारचाकी अडवून पथकाने तपासणी केली असता त्यात चार गायी होत्या. चार गायींची सुटका करीत पथकाने चालक इरफान नुर कुरेशी (रा.काळे चौक,मोठा राजवाडा) याच्या मुसक्या आवळल्या असता त्याने वाहन मालक समीर पठाण (रा.सादिक नगर,वडाळागाव) याने गायी घेण्यासाठी पाठविल्याची कबुली दिली.
सदरच्या गायी मन्नन कुरेशी,शालम चौधरी व आवेश कुरेशी (रा. तिघे जुने नाशिक) यानी कत्तलीसाठी खरेदी केल्याचे समोर आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,मलंग गुंजाळ,दिलीप सगळ,विजय सुर्यवंशी,प्रदिप ठाकरे,अक्षय गांगुर्डे व सविता कवडे आदींच्या पथकाने केली.