नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भुस्सा गोणी आड राज्यात विक्रीस बंदी असलेला दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या कारवाईत चालकास अटक करुन एक्साईज विभागाच्या पथकाने मालवाहू वाहनासह सुमारे २३ लाख ३७ हजार रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई ब विभाग भरारी पथकाने केली.
अमजद शेरखान पठाण (२३ रा.येरमाळा,धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. ब विभाग भरारी पथक बुधवारी (दि.१८) पाथर्डी शिवारात नाका बंदी करीत असतांना भुस्सा गोणी आड होणाऱ्या मद्यवाहतूकीचा भांडाफोड झाला. एमएच १४ इएम ६९११ या मालवाहू वाहनाच्या तपासणीत गोवा निर्मीत व राज्यात विक्रीस बंदी असलेला ॲडरियल क्लासिक व्हिस्की,गोल्ड ॲण्ड ब्लॅक तसेच रिअल्स ओडकाची सुमारे २८५ खोकी आढळून आली.
या कारवाईत चालकास बेड्या ठोकत पथकाने वाहनासह दारूसाठा असा सुमारे २३ लाख ३७ हजार २०० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला असून याप्रकरणी पाच मद्यतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक आर.जे.पाटील, दुय्यम निरीक्षक धिरज जाधव,गणपत अहिरराव,प्रविण वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप जवान अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर,संतोष कडलग,महेंद्र भोये,राकेश पगारे आदींच्या पथकाने केली.