नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनी लॅण्डींग आणि ड्रग्ज तस्करीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी शहरातील एका नोकरदारास चांगलाच दणका दिला असून अंधेरी सायबर सेल मधून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी फंड व्हेरिफेकशनच्या बहाण्याने साडे तेवीस लाख रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय नोकरदाराने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या ३० ऑक्टोबर रोजी भामट्यांनी ९७८५१३४६११ या मोबाईल क्रमांकावरून नोकरदाराशी संपर्क साधला होता. अंधेरी सायबर सेलमधून प्रदिप सावंत बोलत असल्याचे भासवित भामट्यांनी नोकरदारास धमकावले. तुमचे आधारकार्ड हे मनी लॅण्डींग व ड्रग्ज तस्करीतील संशयिताकडे आढळल्याची बतावणी करीत ही फसवणुक करण्यात आली. या घटनांमध्ये आपला संबध नसल्याची विनती तक्रारदाराने केली असता संशयितांनी यातून सुटका करायची असेल तर फंड वेरीफिकशेन करावे लागेल त्यासाठी तुमच्या बँक खात्यातील रक्कम आम्ही सांगू त्या खात्यात वर्ग करावी लागेल असा सल्ला दिला.
त्यानुसार नोकरदाराने ऑनलाईन पैसे पाठविल्याने ही फसवणुक झाली असून या घटनेत २३ लाख ५० हजाराची रक्कम भामट्यानी अन्य खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.