नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॉटेलमधील साहित्यावर कामगारांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत रेस्टॉरंट परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे,एलईडी टिव्ही,संगणक व इलेक्ट्रीक साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन परप्रांतीय कामगारांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश कनोजीया व दिपक गौड (रा.दोघे उत्तरप्रदेश) अशी संशयित कामगारांची नावे आहेत. याबाबत राहूल राम औछानी (रा.आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे. औछानी यांचे शालीमार परिसरात दिल्ली तडका नावाचे हॉटेल असून दोघे संशयित रेस्टॉरंट मधील कामगार आहे. हॉटेल मध्येच दोघे संशयित वास्तव्यास होते. सोमवारी (दि.१६) रात्री औछानी हॉटेल वाढवून आपल्या घरी गेले असता ही घटना घडली.
रेस्टॉरंट मध्येच राहणा-या दोघा भामट्या नोकरांनी हॉटेलमधील सीसीटिव्ही कॅमेरे,एलईडी टिव्ही,संगणक,होम थेअटर,वायफाय राऊटर तसेच प्रिंटर असा सुमारे ४० हजाराचा ऐवज परस्पर काढून घेत पोबारा केला. ही घटना दुस-या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे औछानी आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी आले असता उघडकीस आली. अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.