नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून, मालवाहू टेम्पोसह वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरटयांनी चोरून नेल्या याबाबत भद्रकाली,आडगाव,गंगापूर, अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो चोरीबाबात योगेश मोहन काथवटे (रा.धम्मनगर,कथडा) यांनी फिर्याद दिली आहे. कोथवटे याचा मालवाहू छोटा हत्ती टेम्पो एमएच ०४ एफडी २३१५ गेल्या शुक्रवारी (दि.१३) रात्री जुने नाशिक येथील भगवती नगर कमानी जवळ पार्क केलेला असतांना तो चोरट्यांनी पळवून नेला. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना आडगाव शिवारात घडली. जोरावरसिंग जसवीरसिंग मथारू (रा.बिडीकामगारनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मथारू गेल्या शुक्रवारी आडगाव जकात नाका भागात गेले होते. सुवर्णा गॅरेज समोर लावलेली त्यांची मोपेड एमएच १५ एफआर ०११३ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूररोड भागात घडली. रामेश्वर बाळू केदार (रा.राजमाता जिजामाता गार्डन,गंगापूर गाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. केदार यांची एमएच ०३ एएन ००२९ मोटारसायकल मंगळवारी (दि.१७) सकाळी मित्र रविंद्र करंजकर अल्पावधीसाठी घेऊन गेला होता. करंजकर यांनी गुप्ता गार्डन भागात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवे करीत आहेत.
तिसरी घटना कामटवाडे शिवारात घडली. राकेश अशोक सोनवणे (रा.कौशल्य सोसा. इंद्रनगरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवे यांची पल्सर एमएच १५ एफझेड ४७०६ गेल्या शनिवारी (दि.१४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमघ्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत. तर लक्ष्मण रतन माळी (रा.बागुल हॉस्पिटल,शिवाजी नगर) यांची एमएच १५ जेक्यू ५१९ मोटारसायकल गेल्या ८ डिसेंबर रोजी औद्योगीक वसाहतीतील मंदा इंजिनिअरींग या कंपनीच्या बाहेरील पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.