नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवित एका उच्चशिक्षीत तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार पीडित तरूणी गर्भवती राहिल्याने तीन पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.
सिडकोतील उच्चशिक्षीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार धवल धिरज उपाध्याय (रा.चंद्रपूर) या युवकाशी तिचे प्रेमसंबध जुळले होते. लग्नाचे व घर घेवून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने दोघांमध्ये शरिर संबध जडले. गेल्या चार महिन्यांच्या काळात संशयिताने तरूणीस पुणे व नाशिकमधील वेगवेगळया लॉजिंगवर घेवून जात तसेच युवतीच्या घरी येवून बळजबरीने वेळोवेळी बलात्कार केला.
यातून तरूणी गर्भवती राहिली असता संशयिताने कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.
विनयभंगाच्या दोन घटना
विनयभंगाची पहिली घटना जाधव संकुल भागात घडली. महिलेच्या मुलीस रफीक तांबोळी (रा.वडाळागाव) या तरूणाने आपल्या गाडीत बसवून नेले होते. त्यामुळे महिलेने सोमवारी (दि.१६) रात्री संशयितास नागरेज कार मॉल भागात गाठले असता ही घटना घडली. मुलीच्या अपहरणाबाबत पीडित महिलेने संशयिताकडे जाब विचारला असता संतप्त संशयिताने तिला चारचाकी वाहनावर लोटून देत महिलेचा विनयभंग केला.
तर दुसरी घटना अशोकनगर भागात घडली. अल्पवयीन पिडीता सोमवारी (दि.१६) सायंकाळी जुने पोस्ट आॅफिस भागातून जात असतांना तिला अली हसन नबी खान (१८ रा.सातपूर) या युवकाने गाठले. यावेळी संशयिताने मुलीची वाट अडवत लग्नाची मागणी घातली. मात्र मुलीने त्यास नकार देताच संतप्त तरूणाने तिचा विनयभंग केला. तसेच कमरेला लावलेला धारदार कोयता काढून मुलीच्या अंगावर उगारला व तू माझ्या बरोबर लग्न केले नाही तर सोडणार नाही अशी धमकी दिली. दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लेंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे जमादार मुसळे आणि उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.