नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाची राजरोसपणे विक्री सुरू असून, सोमवारी (दि.१६) वेगवेगळया भागात चोरीछुपी विक्री करणा-या तिघांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत ९५ हजार रूपये किमतीचे मांजा गट्टू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी मुंबईनाका,इंदिरानगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळारोडवरील न्यु भारत गादी सेंटर परिसरात एक तरूण नॉयलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती.. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पथकाने सापळा लावून साहिल सलीम मन्सुरी (रा.ग्रिन रेसि.हिरवेनगर,दादासाहेब गायकवाड सभागृहाजवळ) या युवकाच्या मुसक्या आवळल्या संशयिताच्या ताब्यातून सुमारे ८३ हजार रूपये किमतीच्या ८३ गट्टू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार योगेश परदेशी यानी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक काकुळते करीत आहेत.
दुसरी कारवाई सदिच्छानगर भागात करण्यात आली. सदिच्छानगर येथील मोकळया मैदानावर एक तरूण बेकायदा मांजाची विक्री करीत असल्याची माहिती इंदिरानगर पोलीसांना मिळाली होती. सोमवारी रात्री पोलीसांनी धाव घेत वेदांत संजय रोकडे (रा.भव्य रेसि.कार्तिकेय नगर कामटवाडा ) या संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात रोकडेच्या अंगझडतीत ७ हजार २०० रूपये किमतीचे १२ प्लॅस्टीकचे गट्टू आढळून आले असून याबाबत अंमलदार अमोल कोथमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.
तिसरी कारवाई चेहडी पंपीग भागात करण्यात आली. सिन्नर फाटा येथील चेहडी पंपीग सिटी लिंक बस डेपो एक व्यक्ती मांजा विक्री साठी आल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांच्य गुन्हे शोध पथकास मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सीटीलिंक बस डेपो भागात सापळा लावला असता योगेश विनोद जाधव (रा.शिंदेगाव ता.जि.नाशिक ) हा संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला. त्याच्या ताब्यात पाच हजार रूपये किमतीचे दहा गट्टू आढळून आले असून याबाबत अंमलदार योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार विष्णू गोसावी करीत आहेत.