नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद येथील शांतीनगर आणि सिडकोतील पवननगर भागात रविवारी (दि.१५) बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री प्रकरणी पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून सुमारे २० हजार रूपये किमतीचे २५ गट्टू जप्त करण्यात आले असून याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मखमलाबादरोडवरील शांतीनगर भागात एक तरूण नॉयलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री पथकाने धाव घेत शांतीनगर बसस्टॉप मागे आदित्य सुरेश सनदे (रा.मखमलाबाद नाका) या युवकाच्या मुसक्या आवळल्या संशयिताच्या ताब्यातून २ हजार ८०० रूपये किमतीचे चार गट्टू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार पंकज चव्हाण यानी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी कारवाई सिडकोतील राजरत्ननगर भागात करण्यात आली. राजरत्न नगर गार्डन समोर एक तरूण बेकायदा मांजाची विक्री करीत असल्याची माहिती अंबड पोलीसांना मिळाली होती. रविवारी रात्री पोलीसांनी धाव घेत मयुर नंदकिशोर सोनवणे (रा.राजरत्ननगर,पवननगर) या संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यात सुमारे १६ हजार ८०० रूपये किमतीचे २१ गट्टू आढळून आले असून याप्रकरणी अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.