नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात धारदार शस्त्र बाळगणा-यांची संख्या वाढली असून, त्यातून प्राणघातक हल्ले घडत आहेत. रविवारी (दि.१५) वेगवेगळया भागात दोघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अॅटोरिक्षाचालकासह महामार्गावर दुकान लावून चष्मे विक्री करणा-या व्यावसायीकाचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मेरी लिंक रोडवरील अविनाश आबा काळे – मराठे (रा.मानेनगर) हा रिक्षाचालक रविवारी रात्री पेठफाटा भागात प्रवासी भरण्यासाठी गेला होता. प्रवासी न मिळाल्याने तो परिसरातून रिकामी रिक्षा घेवून निघाला असता पाठीमागून डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्या रिक्षास आडवी मोटारसायकल लावली. यावेळी खाली उतरवून त्यास तू आम्हाला कट का मारला असा जाब विचारला. यावेळी अविनाश दोघांना समजावून सांगत असतांना एकाने पकडून ठेवत दुस-याने त्याच्यावर धारदार वस्तूने वार केला. या घटनेत अविनाश काळे – मराठे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत वडिल आबा मराठे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
दुसरी घटना महामार्गावरील जैन मंदिर परिसरात घडली. अंकित वासुदेव येशी (३३ रा.मखमलाबाद गाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. येशी महामार्गावर चष्मे विक्री करतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास ते आडगाव शिवारातील जैन मंदिरासमोर गॉगल विक्रीचा स्टॉल लावून आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. आडगावच्या दिशेने जाणारे दोन दुचाकीवरील चौघे जण त्यांच्या स्टॉलवर चष्मे घेण्यासाठी थांबले होते. चौघानी पसंतीची चष्मे घेवून पैसे न देता येशी यांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत टोळक्याने पोबारा केला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.