नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना क्रांतीनगर भागात घडली. या हाणामारीत काही तरी टोकदार वस्तू वापरण्यात आल्याने २५ वर्षीय युवक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम दत्तू चोथवे (३८ रा.विद्यानगर,शांतीनगर), सोनू शर्मा (२७ रा.मायको दवाखान्याजवळ,फुलेनगर) व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत राहूल गोरख येलमामे (२५ रा.क्रांतीनगर,मखमलाबादरोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. येलमामे शुक्रवारी (दि.१३) रात्री गणेश चौक परिसरात रस्त्यावर उभा असतांना टोळक्याने त्यास गाठले. यावेळी चोथवे याच्याशी झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी एकाने टोकदार वस्तूने येलमामे याच्या हातावर व पाठीवर मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार नांदुर्डीकर करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना वासननगर भागात घडली. या घटनेत सुमारे ३२ हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरूपमा गोविंदसिंग बोरसे (रा.गामणे स्टेडिअम,वासननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोरसे या शुक्रवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास गामणे ग्राऊंड कडून वासन टोयाटो शेरूमच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. शुभम किराणा दुकान परिसरात समोरून दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीची सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.