नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अनैतिक संबधाबाबत बदनामी करण्याची धमकी देत बंटी बबलीने एका व्यावसायीकाकडून तब्बल साडे सात लाख रूपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहा लाख रूपयांची मागणी करीत भामट्यांनी धाकदडपशा दाखवित बळजबरीने ऑनलाईन पध्दतीने रक्कम आपल्या बँक खात्यात वर्ग केली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार सोनाली उर्फ सुवर्णा चव्हाण (रा.ज्ञानेश्वरनगर) व आनंत नामक इसम अशी व्यावसायीकाकडून खंडणी वसूल करणा-या संशयित बंटी बबलीचे नाव आहे. याबाबत अनिल सुकलाल सिनकर (५० रा.संजिवनगर,अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. सिनकर किराणा व्यावसायीक असून त्यांचे किराणा दुकान आहे. संशयित महिलेचे किराणा दुकानात येणे जाणे असल्याने दोघांमध्ये परिचय झाला होता. या ओळखीतून गेल्या ऑगष्ट महिन्यात महिलेने सिनकर यांना आपल्या घरी बोलावले असता ही घटना घडली. संशयित महिलेने आनंत नामक व्यक्तीशी कट कारस्थान करीत तसेच ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घरी बोलावून महिलेने व्यावसायीकाशी जबरदस्तीने अंगलटपणा केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले असून, याघटनेचा आनंत नामक संशयिताने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ बनविला. यात दोघांनी शिवीगाळ व मारहाण करीत महिलेशी अनैतिक संबध असल्याबाबत वदवून घेतले. त्यानंतर दि.२२ ऑगष्ट ते १२ डिसेंबर या काळात व्यावसायीकास ब्लॅकमेल करण्यात आले. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भामट्यांनी व्यावसायीकास पाथर्डी फाटा येथील पुजा टेक्सटाईल्स परिसरात गाठून तसेच महिलेच्या घरी बोलावून घेत हे कृत्य केले असून या ठिकाणी व्यावसायीकाच्या मोबाईल हिसकावून घेत ७ लाख ५३ हजार ५०० रूपयांची रक्कम फोन पे च्या माध्यमातून परस्पर अन्य खात्यात वर्ग करून घेतली. संशयितांच्या जाचास कंटाळून अखेर व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भंडे करीत आहेत.