नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात विनयनगर येथे भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनयनगर येथील वैभव भारत गाडेकर (रा.स्नेहल अपा.) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गाडेकर कुटुंबिय बुधवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास अल्पवधीसाठी घराबाहेर पडले असा ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली चार लाख रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७ लाख १० हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचे मंगळसूत्र अडिच तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट,दोन जोड कानातील झुबके, मंगळसुत्राच्या वाट्या व ओमपान आदी अलंकाराचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शिरसाठ करीत आहेत.
दुसरी घटना कॉलेजरोड भागात घडली. याबाबत डॉ.शशिकांत पंढरीनाथ चौधरी (रा.गणाधिप गोदावरी सोसा.लिलावती हॉस्पिटलच्या बाजूला) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. चौधरी यांचे कुटुंबिय सोमवारी (दि.९) रात्री कामानिमित्त मुंबई येथे गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या टेरेसवरील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून सुमारे ४७ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.११) दुपारी कुटुंबिय घरी परतल्यानंतर उघडकीस आली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.