नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एका महिलेस गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुमारे दीड लाखाची फसवणुक करण्यात आली असून मुद्दल आणि परतावा पदरात न पडल्याने गुंतवणुकदार महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाईपलाईनरोड भागात राहणाºया ४४ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या २२ फेब्रुवारी रोजी सायबर भामट्यांनी महिलेशी संपर्क साधला होता. व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर विश्वास संपादन करून भामट्यांनी महिलेस बँक खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडले असून २२ फेब्रुवारी ते १२ एप्रिल दरम्यान महिलेने १ लाख ४५ हजाराची रोकड संशयितांच्या बँक खात्यात वर्ग केली.
मात्र सात ते आठ महिने उलटूनही गुंतवणुकीसह मोबदला पदरात न पडल्याने महिलेने संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू तो होवू शकला नाही. त्यामुळे महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.