नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) चार्जिंगला लावलेला मोबाईल काढत असतांना सूनेने वृध्द सास-यावर पाठीमागून चाकू हल्ला केल्याची घटना भाभानगर परिसरात घडली. या घटनेत ६८ वर्षीय सासरा जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार राणी रोकडे (रा.हरी बाहर सोसा.जवळ,हिरवेनगर) असे सासºयावर चाकू हल्ला करणा-या संशयित सूनेचे नाव आहे. याबाबत अनिल खंडेराव रोकडे यांनी फिर्याद दिली आहे. रोकडे गेल्या २० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना ही घटना घडली.
सून राणी व तिचा मुलगा आर्या यांच्यात मोबाईलच्या कारणातून वाद सुरू होता. यावेळी रोकडे चार्जिंगला लावलेला आपला मोबाईल काढण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला. चार्जींगला लावलेला मोबाईल काढत असतांना पाठीमागून धारदार चाकू घेवून आलेल्या सूनेने त्यांच्या पाठीवर वार केला. या घटनेत रोकडे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.