नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी (दि.१०) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात सोळा वर्षीय मुलीसह ३४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावाडीतील प्रशांत पंडीतराव निकम (३४ रा.मनोज बंगला शिवकृपा नगर) यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. पत्नी वैशाली निकम यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.
दुसरी घटना साईनाथनगर येथे घडली. पायल रमेश मगर (१६ रा.आशिर्वाद बंगलो,साईनाथनगर) या युवतीने मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत कुटुंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.
कुरापत काढून बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण करीत टोळक्याने एकास लुटल्याची घटना व्हिक्टर पॉईंट भागात घडली. या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळक्याने युवकाच्या खिशातील सहा हजार रूपये बळजबरीने काढून पोबारा केला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय वसंत जाधव,पंकज सोनवणे व अनोळखी इसम असे लुटमार करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुनिल काशिनाथ पवार (रा.महात्मा गांधी चौक,प्रबुध्दनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पवार गेल्या २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास व्हिक्टर चौकात गेले होते. या ठिकाणी संशयितांनी त्यांना गाठून मागील भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली याप्रसंगी भामट्यांनी जखमी पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील सहा हजाराची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भडांगे करीत आहेत.
मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना हॉटेल राधीका भागात घडली. या घटनेत सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल भामट्यांनी पळविला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम श्रीरामचरण प्रकाश (२२ रा. राधीका हॉटेल,रेल्वे स्टेशनरोड) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. प्रेम प्रकाश मंगळवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसमवेत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. मोबाईलवर बोलत तो पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून शिवाजी पुतळयाच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.