नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला मुलींवरील अत्याचार वाढले असून, वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोन तरूणींना परिचीत भामट्यांनी प्रेमाच्या जाळयात अडकवित बलात्कार केला तर गार्डनमध्ये मैत्रीणीसमवेत खेळण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सरकारवाडा,इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गंगावाडी भागात राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भावजयीच्या भावाने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. भावाच्या शालकाने आपल्या प्रेमाच्या जाळयात अडकवित तरूणीस गंगावाडी आणि स्व:ताच्या रविवार कारंजा भागातील घरी बोलावून घेत बळजबरीने बलात्कार केला. तसेच गेल्या वर्षभरात फिरण्याच्या बहाण्याने त्र्यंबकरोडवरील विविध लॉजवर घेऊन जात तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केला. या काळात मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याने हा प्रकार केला असून बहिणीचा विवाह मोडण्यासह वडिलांना अमली पदार्थाच्या गुह्यात अडकविण्याची धमकी देत हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरूणीच्या महाविद्यालयात जावून चारित्र्यावर संशय घेत संशयिताने मारहाण केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक कदम करीत आहेत.
दुसरा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आकाश गजानन चव्हाण (रा.म्हसरूळ) या युवकाने प्रेमाच्या जाळयात अडकवित पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले होते. सन.२०२१ पासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणात संशयिताने युवतीस म्हसरूळ तसेच त्र्यंबकरोडवरील वेगवेगळया हॉटेलमध्ये घेवून जात बळजबरीने बलात्कार केला. मुलीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
तर सिडकोतील अल्पवयीन मुलगी गेल्या २९ नोव्हेंबर रोजी आपल्या मैत्रीणीसमवेत बाबुराव मटाले उद्यान तथा संत ज्ञानेश्वर मंदिर गार्डन भागात गेली असता तेथे झोपडी करून राहत असलेल्या योगेश किशोर शिंदे (३४ रा.त्रिमुर्तीचौक) याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने घरी जावून कुटूबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बागुल करीत आहेत.