नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गहाळ झालेल्या वकिल महिलेच्या क्रेडिट कार्डचा भामट्यांनी परस्पर वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. दहा हजार रूपयांची रोकड काढूनही वाहनात पेट्रोल भरण्यासाठी कार्डचा वापर करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुमिका अशोक गोसावी (रा.गजानन कॉलनी,रासबिहारी मेरी लिंकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गोसावी यांचे एसबीआय बॅकेचे क्रेडिट कार्ड काही दिवसांपासून गहाळ झाले आहे. गेल्या शनिवारी (दि.७) सकाळच्या सुमारास त्याचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. भामट्यांनी कार्डचा दुरूपयोग करीत परस्पर कार्ड स्वॅब करून दहा हजाराची रोकड लांबविली. त्यानंतर द्वारका येथील बेला पेट्रोल पंपावर ५०० रूपयांचे पेट्रोल भरल्याने हा प्रकार समोर आला.
मोबाईलवर याबाबत संदेश प्राप्त झाल्याने गोसावी यांनी पेट्रोल पंपावर धाव घेत सीसीटिव्ही यंत्रणेची तपासणी केली असता त्यात एमएच २० आरडब्ल्यू ६३७५ या दुचाकीस्वाराने कार्डचा गैरवापर केल्याचे पुढे आले असून अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.