नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन पार्किंगचे पैसे मागितल्याच्या वादातून टोळक्याने बापलेकास बेदम मारहाण केल्याची घटना विजय ममता थेअटर भागात घडली. या घटनेत लाकडी दांडका,लोखंडी पाईप व अन्य साधनांनी मारहाण करण्यात आल्याने बापलेक जखमी झाले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राण लक्ष्मण मोरे (रा.इंदिरानगर झोपडपट्टी,कॅनोलरोड) व त्याचे सात ते आठ साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दिपक अनंत यशवंते (रा.सिध्दार्थ नगर,नाशिक पुणा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दिपक यशवंते व मुलगा विकी यशवंते हे दोघे बापलेक विजय ममता थेअटर या सिनेमा हॉल परिसरातील पार्किंग व्यवस्था सांभाळतात. अन्य सहका-यांसमवेत रविवारी (दि.८) रात्री यशवंते बापलेक आपली सेवा बजावत असतांना त्यांनी दोघांकडे वाहन पार्किंगचे पैसे मागितल्याने ही घटना घडली.
आम्ही मंगेश भाऊचे माणसे असून या भागातील भाई आहोत असे म्हणत तू आमच्या कडे कसे पैसे मागू शकतो तुम्हा सर्वांना बघून घेतो अशी धमकी देत संतप्त दुकलीने अन्य ७ ते ८ साथीदारांना बोलावून घेत ही हाणामारी केली. टोळक्याने यशवते बापलेकास लाकडी दांडक्यासह लोखंडी पाईप व अन्य साधनांनी बेदम मारहाण केली असून या घटनेत पित्याचा हात फॅक्चर झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी आहे.त्यातील एकाचे नाव समोर आल्याने संशयितासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.