नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोघा भामट्यांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना भोसला मिलटरी स्कूल परिसरात घडली. महिलेने कशीबशी सुटका करून घेत बचावासाठी बाथरूममध्ये कोंडून घेतल्याने ती बालंबाल बचावली असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतकबीरनगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडितेने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन सीसीटिव्ही कॅमेरे खरेदी केले होते. त्यामुळे तिने ऑनलाईन पध्दतीनेच कॅमेरे बसविण्या-याचा शोध घेतला. नाशिकस्थित निखील नामक तरूणाचा नंबर मिळवीत तिने संपर्क साधला असता ही घटना घडली. रविवारी (दि.८) सकाळच्या सुमारास दुचाकीवर दोन तरूण महिलेच्या घरी आले होते. निखील व त्याच्या समवेत आलेल्या तरूणाने सीसीटिव्हीची पाहणी करीत विचारपूस केली. घरात शिरलेल्या एकाने दरवाजाजवळ स्टूलवर उभे राहून कॅमेरा बसविण्यासाठी बहाणा केला तर दुस-याने महिलेस कुठे कुठे कॅमेरे बसवायचे असे म्हणत महिलेस आतील रूममध्ये घेवून जात तिचा विनयभंग केला.
संशयिताने महिलेशी अंगलट करताच दुस-यानेही तेथे येवून महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड करीत कशी बशी सुटका करून घेत बाथरूममध्ये कोंडून घेतल्याने अनर्थ टळला असून संशयितांनी याबाबत वाच्यता केल्यास तुला मारून टाकू अशी धमकी देत पोबारा केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.