नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वधू वरासमवेत छायाचित्र काढणे डोंबिवलीच्या दांम्पत्यास चांगलेच महागात पडले आहे. विवाहसोहळयातून दाम्पत्याच्या हॅण्ड बॅगवर चोरट्यांनी डल्ला मारला असून त्यात दीड लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाखाचा ऐवज होता. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रौनक विजय जैन (रा.डोंबीवली,मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. जैन दांम्पत्य विवाह सोहळयानिमित्त शुक्रवारी (दि.६) शहरात आले होते. महामार्गावरील हॉटेल ज्युपिटर येथे विवाह सोहळा आटोपून दांम्पत्या वधू वरांसमवेत छायाचित्र काढण्यासाठी स्टेजवर गेले असता ही घटना घडली.
जैन यांनी हातातील हॅण्ड बॅग खुर्चीवर ठेवून ते छायाचित्र काढण्यात मग्न असतांना भामट्यांनी हॅण्ड बॅग चोरून नेली. याबॅगेत एक लाख ४० हजाराची रोकड व सोन्यचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ९० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.