नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिकमधील कथडा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे संसारोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद काशिनाथ बकरे (रा.धम्मनगर,कथडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बकरे कुटुंबिय गेल्या मंगळवारी (दि.३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी पत्र्याच्या पेटीत ठेवलेली २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे तसेच ताब्याचे भांडी असा सुमारे ४८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार सोळसे करीत आहेत.
५० हजाराच्या मंगळसुत्रावर भामट्यांचा डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत चोरट्यानी प्रवासी महिलेच्या गळय़ातील मंगळसुत्र हातोहात लांबविल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. या घटनेत सुमारे ५० हजाराच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया चंद्रकांत येवले (रा.विधातेनगर,श्रीश्री रवी शंकर मार्ग) यांनी फिर्याद दाखल केली आहे. येवले या गुरूवारी (दि.५) दुपारच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. नाशिक सटाणा या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.