नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात धुमाकूळ घालणारा अट्टल मोटारसायकल चोर पोलीसांच्या हाती लागला असून त्याच्या ताब्यातून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयिताच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
किरण विलास जाधव (२८ रा.गणेश नगर देवी मंदिर पिंपळगाव खांब ता.जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. सिबीएस परिसरात दुचाकी चोरटा येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला. पोलीस तपासात तो अट्टल दुचाकी चोर असल्याचे समोर आले असून त्याने देवळाली कॅम्प आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या दोन गुह्याचीं कबुली दिली आहे.
संशयिताच्या ताब्यातून एमएच ११ एएन ९१०८ व एमएच १५ बीजी ५१०९ या चोरीच्या सुमारे एक लाख रूपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून संशयितास मुद्देमालासह देवळाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार धनंजय शिंदे प्रदीप म्हसदे, उत्तम पवार,रोहिदास लिलके,विशाल काठे, प्रशांत मरकड, संदीप भांड, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, देवीदास ठाकरे, विशाल देवरे, अमंलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, शर्मिला कोकणी, अनुजा येवले, मनीषा सरोदे व चालक समाधान पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.