नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धात्रकफाटा भागात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. भावाच्या घरातील रोकडसह दागिन्यांवर बहिणीनेच डल्ला मारल्याचे उघड झाले असून, तिने रिक्षाचालकाच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या संशयित दुकलीच्या ताब्यातून सुमारे एक लाख ९१ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, संशयित बंटी-बबलीस म्हसरूळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी रमेश जोगदंड (वय ३५, रा. भांगरे मळा, प्रगती कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील धात्रक फाटा येथे दि. २४ नोव्हेंबर रोजी ही घरफोडी झाली. आशापुरी हौसिंग सोसायटीत राहणारे कुटूंबीय विवाह सोहळ्यानिमित्त मुंबई येथे गेले असताना चोरट्यांनी भरदिवसा बंद घराच्या पाठीमागील सेफ्टी दरवाजाची जाळी तोडून व कडी उघडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूमधील कपाटात ठेवलेली ६० हजारांची रोकड व सोने- चांदीचे दागिने असा तीन लाख ५८ हजार २११ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस चोरट्यांचा माग काढत असताना युनिटचे हवालदार प्रशांत मरकड व नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
घरमालकाच्या बहिणीनेच ही घरफोडी केली असून, ती रासबिहारी लिंक रोडवरील साईश्रद्धा पेट्रोल पंपावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने महिलेस ताब्यात घेत चौकशी केली असता, तिने रवि जोगदंड या रिक्षाचालकाच्या मदतीने भावाच्या घरात चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जोगदंड यास उपनगर रिक्षा थांबा येथून अटक केली. त्याने चोरी केलेले अलंकार कल्याण शहरात विकले असून, त्यामोबदल्यात मिळालेले पैसे घरात असल्याची माहिती दिली. त्यानुसार एक लाख ९१ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, संदीप भांड, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, देवीदास ठाकरे, विशाल देवरे, अमंलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, शर्मिला कोकणी, अनुजा येवले, मनीषा सरोदे व चालक समाधान पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.