नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ३ लाख २२ हजार ५०० रूपये किमतीचा सुमारे ६१.५ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करुन चार जणांना अटक केली आहे. अजय भिका रायकर (वय ३६), मोसिन हानिफ शेख (३६) व अल्ताफ पीरण शहा (३५, तिघे रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव) व आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ (३०, रा. भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, तलाठी कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितामधील श्रीश्रीमाळ हा एमडी पुरवठादार आहे.
शुक्रवारी (दि. ६) पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अशोका मार्ग भागात एमडी विक्रेते येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला असता अजय रायकर,मोसिन शेख व अल्पाफ शहा पोलीसांच्या हाती लागले. संशयितांच्या अंगझडतीत सुमारे ६१.५ ग्रॅम वजनाचा व २ लाख ९७ हजार पाचशे रुपये किमतीचा एमडी अमली पदार्थ आढळून आला. पोलीस तपासात त्यांनी आकर्षण श्रीश्रीमाळ याच्याकडून एमडी विक्री करण्यासाठी खरेदी केल्याची कबुली दिल्याने श्रीश्रीमाळ यास बेड्या ठोकण्यात आल्या. श्रीश्रीमाळ वगळता अन्य तिघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवार (दि.९) पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बळवंत कोल्हे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड आदींच्या पथकाने केली.