नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकमधील संभाजीनगर परिसरातील क्रांतिनगर झोपडपट्टीत ३० वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. कोयता, लाठ्या, काठ्यांनी प्रहार करत हे कृत्य करण्यात आले. नितीन शंकर शेट्टी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली नाहिती अशी की, शुक्रवारी कामावरून आल्यावर त्याने जेवण केले. सायंकाळी पाच वाजता तो घरात झोपला होता. त्याचा लहान मुलगा घराबाहेर खेळत होता. त्याचवेळेस दोन दुचाकीवर आलेल्या चार ते पाचजणांपैकी दोघांनी नितीन यास झोपेतून उठवत महत्त्वाचे काम असल्याचे सांगत बाहेर बोलविले. नितीन घराबाहेर येताच दबा धरून असलेल्या इतर तिघांनी नितीनवर कोयत्याने सपासप वार केले. चेहरा, मान, पाठ व हातावर वार केल्याने नितीन प्रतिकार करू शकला नाही. हल्लेखोरांनी नितीनच्या उजव्या डोळ्यावरही वार केले. त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला होता, तर मानेची नस कापली गेल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. चेहऱ्यावरही खोलवर जखमा झाल्या होत्या, तर दोन्ही हातांच्या मनगटावरही गंभीर जखमा आढळून आल्या. मोठा रक्तस्त्राव झाल्याने नितीन गतप्राण झाला.
त्याच्या ‘भावासह शेजारच्या काही मंडळींनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रात्री दहा वाजता त्यास मृत घोषित करण्यात आले. सामान्य रुग्णालयात स्थानिक रहिवासी तसेच नितीनच्या कुटुंबीयाची मोठी गर्दी झाली होती घटना घडली तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरा मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.