नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तू आमच्याकडे काय बघतो या वादातून मद्यपी टोळक्याने एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना महामार्गावरील कमोदनगर भागात घडली. या घटनेत ४२ वर्षीय इसम जखमी झाला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव चव्हाण, ऋषीकेश खराटे व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत समीर सलीम शेख (४२ रा.गरीबनवाज कॉलनी,वडाळागाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख बुधवारी (दि.४) रात्री कमोदनगर येथील सर्व्हीस रोडला असलेल्या गपशप बिअरबार आणि रेस्टॉरंट मध्ये गेले होते.
ऑर्डर देवून ते आपल्या टेबलावर बसलेले असतांना मद्यपान करणा-या समोरील टेबलावरील संशयितांनी तू आमच्याकडे काय बघतो यावरून वाद घातला. शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने संतप्त टोळक्याने शेख यांना शिवीगाळ करीत थेट लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत एकाने शेख यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास जमादार माळी करीत आहेत.