नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पैसे डबल करून देतो असे सांगत भामट्यांनी एका वृध्दास फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. वृध्दाची १८ हजाराची रोकड भामट्यांनी हातोहात लांबविली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ सखाराम ढवळे (७३ रा.सम्राटनगर,दिंडोरीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ढवळे गुरूवारी (दि.५) पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते. रोकड काढून ते घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. एरंडवाडीतील मुक्ताई किराणा दुकानासमोरून ते घराकडे जात असतांना पाळतीवर असलेल्या दोघा अनोळखी भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी बँकेतून काढून आणलेली रक्कम डबल करून देतो असे सांगून भामट्यांनी १८ हजार रूपये हातोहात लांबविले.
रूमालात रक्कम ठेवून त्यांनी मत्रोच्चार केला. यावेळी सदरची रक्कम घरी जावून काढण्याचा सल्ला देण्यात आल्याने ढवळे यांनी घरी पोहचताच रूमालात बांधलेली रक्कम उघडून बघितली असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.