नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इन्स्टाग्रामवर परप्रांतीयाशी मैत्री करणे एका महिलेस चांगलीच महागात पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून भामट्यांनी पीडितेवर वर्षभर वेगवेगळया ठिकाणी घेवून जात बलात्कार केला असून, आर्थिक फसवणुक केल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुर्शिद नईम अन्सारी (रा.ललमटीया जि. बांका, बिहार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयिताशी ओळख झाली होती. गेल्या वर्षी संशयिताने नाशिक गाठून महिलेची भेट घेतली. यावेळी त्याने थेट विवाहाची मागणी घातल्याने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
शालिमार येथील सरकारी भवन तसेच अन्य ठिकाणच्या लॉंजिगवर घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार गेल्या वर्षभर चालला. या काळात संशयिताने पिडीतेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून सुमारे २० हजाराची रक्कम हातउसनवार घेतली. पैसे परत न देताच त्याने टाळाटाळ केल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.