नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा)– एमबीबीएस फार्माकोलॉजी विषयाचा पेपर व्हॉट्सॲप ग्रुपवर लिक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेपर सुरू होण्याच्या एक तास आधीच हा पेपर लिक करण्यात आला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी किशोर दगडू जोपळे (रा. केतकी सोसायटी, म्हसरूळ) हे म्हसरूळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यालयात होते. तेथील जोपळे यांच्या कार्यालयातील अधिकृत ई-मेल आयडीवर एक मेल आला. फिर्यादी जोपळे यांच्या परीक्षा विभागाचा ई-मेल यावर २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्या सत्रामध्ये द्वितीय एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या फार्माकोलॉजी या विषयाची परीक्षा होती.
मात्र या विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या एक तास अगोदरच कोणी तरी अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपवर लिक केली, तसेच याबाबतचा संदेश जोपळे यांना प्राप्त झाला. तो संदेश वाचल्यानंतर पेपरफुटीची कल्पना आल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.