नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कौटूंबिक वादातून पतीचा खून करून पसार झालेल्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना वडाळागावात २०२२ मध्ये घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदाबाई दिलीप कदम (रा.माळी गल्ली,वडाळागाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या निर्दयी महिलेचे नाव आहे. या घटनेत दिलीप रंगनाथ कदम यांचा निर्घुन खून करण्यात आला होता. कदम दांम्पत्य वडाळागावातील माळी गल्लीत वास्तव्यास असतांना ही घटना घडली होती.
२२ ते २४ सप्टेंबर दरम्यान दांम्पत्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. या वादातून संतप्त नंदाबाई हिने पती झोपी गेल्याची संधी साधत ही हत्या केली होती. पहाटेच्या सुमारास दिलीप कदम हे साखर झोपेत असतांना पत्नी नंदाबाई हिने पतीचे हात पाय बांधून लाकडी फळीने डोक्यात प्रहार केला होता. यावरच न थांबता तिने दिलीप कदम याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले होते. पती मृत झाल्याचे लक्षात येताच तिने पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मृतदेहाच्या तोंडात कापडी बोळा कोंबुन तसेच गादीत गुंडाळून मृतदेह पलंगाखाली ठेवून घरास कुलूप लावून पोबारा केला होता. घरातून दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली होती.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस.डी.जगमलानी यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड.शिरीष कडवे यांनी काम पाहिले असता कोर्टाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांची साक्ष तसेच तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी महिलेस दोषी ठरवत जन्मठेप व सहा हजार रूपये दंडीचा शिक्षा सुनावली.