नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सावरकरनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल पुंडलिक माळी (रा. वेदमाला सोसायटी, सावरकरनगर) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. माळी कुटूंबिय सोमवारी (दि.२) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ११ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.
९० हजाराचे मंगळसूत्र चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड येथील जयभवानीरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेत सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी लांबविले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाक्षी जयवंतराव कदम (रा.कमलापार्क,सुमन हॉस्पिटलजवळ जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. कदम सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास परिसरात राहणा-या आपल्या बहिणीच्या घरी गेल्या होत्या. बहिणीस भेटून त्या आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. वक्रतुंड किराणा दुकानासमोरून त्या रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत.