नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एकास दोन लाख रूपयांना चूना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडिट कार्डच्या गोपनिय माहितीच्या आधारे भामट्यांनी परस्पर अन्य खात्यात रकमा वर्ग केल्या असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ४४ वर्षीय इसमाशी २७ सप्टेंबर रोजी संपर्क साधण्यात आला होता. एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगून नेहा नावाच्या मुलीने नवीन क्रेडिट कार्ड आले काय याबाबत विचारणा केली होती. यावेळी कार्ड अॅक्टीव्ह करीत असल्याचे सांगून तिने नव्याने प्राप्त झालेल्या क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती मिळविली त्या माहितीच्या आधारे ही फसवणुक करण्यात आली असून अवघ्या काही दिवसात केर्डीट कार्डचा वापर करीत भामट्या महिलेने १ लाख ९१ हजार ५३९ रूपयांचा गंडा घातला आहे.
क्रेडिट कार्डच्या परस्पर वापराची ही बाब लक्षात येताच तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून सदर मोबाईलधारक महिला व पैसे वर्ग करण्यात आलेल्या वॉलेटधारकाविरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.
 
			








