नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात कुणी नसल्याची संधी साधत एकाने लहान मुलांना सांभाळण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची वाच्यता केल्यास कुटूंबियास जीवे मारण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी नराधमास तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
शोएब सांडू शेख (रा. नानावली, जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती गेल्या महिन्यात संशयिताच्या घरी लहान मुलांना सांभाळण्यासाठी गेली असता ही घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने घराचा दरवाजा आतून लावून घेत तसेच पीडित मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
या घटनेची वाच्यता केल्यास आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिल्याने मुलीने अत्याचार सहन केला मात्र यानंतर संशयिताने आईच्या मोबाईलवर फोन करून मुलीशी संपर्क साधल्याने या घटनेचा भांडाफोड झाला असून, अश्लिल संभाषण केल्याने कुटुंबियासह पीडितेने पोलीसात धाव घेतली आहे. या घटनेची दखल घेत पोलीसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.