नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिरिक्त भाराचे पैसे वाचविण्यासाठी दोन अवजड वाहनांना एकच नंबर वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिवहन विभागाच्या डोळयात धुळफेक करीत सिनेस्टाईल शासनाचा महसूल बुडविणा-या या प्रकाराचा नाशिक पोलीसांनी भांडाफोड केला असून, चालकास अटक करीत पथकाने दोन मालवाहू आयशर ट्रक जप्त केले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
अताउल्ला बैतुल्ला चौधरी (रा.विराटनगर,अंबडलिंकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मालट्रक चालकाचे नाव आहे. शहरातील एकाच क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून अतिरक्त भार वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे शहर पोलीस मालवाहू वाहनांवर लक्ष ठेवून असतांना शासनाचा महसूल बुडविण्याचा हा गोरख धंदा समोर आला. युनिटचे अंमलदार नाझीमखान पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी (दि.२) असतांना औद्योगीक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट ते ग्लॅक्सो पॉईंट दरम्यान सापळा लावला असता स्कॅप मटेरियल वाहतूक करणारी एमएच ०४ केएफ ७१४१ ही एकच नंबर असलेली दोन आयशर मालट्रक पोलीसांच्या हाती लागले.
पथकाने संशयित चालक चौधरी याची चौकशी केली असता त्याने शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने दोन्ही वाहनांवर एकच नंबर टाकण्यात आल्याची कबुली दिली. अतिरिक्त भाराचे पैसे वाचविण्यासाठी चक्क दोन वाहनांवर एकच नंबर टाकण्यात आल्याचा प्रकार समोर येताच पथकाने चालकास ताब्यात घेत सुमारे २५ लाख रूपये किमतीचे दोन्ही मालट्रक जप्त केले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके व युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,नाझीमखान पठाण,प्रदिप म्हसदे,शरद सोनवणे,विशाल देवरे,अमोल कोष्टी समाधान पवार आदींच्या पथकाने केली.