नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागात राहणा-या तिघानी सोमवारी (दि.२) आत्महत्या केली. त्यात एका २८ वर्षीय तरूणासह दोन विवाहीतांचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत देवळाली कॅम्प,उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
शिंगवेबहुला येथील गणेश पंडीत पिटाळकर (२८ रा.चारणवाडी,शिंगवे बहुला) या युवकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ नितीन पिटाळकर याने त्यास तात्काळ कॉन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.
दुसरी घटना नाशिकरोड येथील कॅनोलरोड भागात घडली. संगिता अनिल साळवे (२२ रा.इंदिरानगर झोपडपट्टी) या विवाहीतेने सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. दीर सुनिल साळवे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ. स्वप्निल पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली. संगिता भानूदास पवार (४५ रा.सिध्दीविनायक सोसा. माऊली लॉन्स) या महिलेने अज्ञात कारणातून रविवारी (दि.१) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती भानूदास पवार यांनी त्यांना तात्काळ सायखेडकर हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी उपचार सुरू असतांना डॉ.अश्विनी निकम यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.