नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बँक ग्राहकांना सायबर भामट्यानी चांगलाच दणका दिल्याचा प्रकार समोर आला. पिएम किसान योजना मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून एकास तर दाम्पत्याच्या बँक खाते परस्पर दुस-या मोबाईलशी जोडून भामट्यांनी तब्बल २१ लाख रूपयांना गंडविले आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका बँक ग्राहकाच्या व्हॉटसअॅपवर पीएम किसान योजना या नावाचे लिंक पाठविण्यात आली होती. ग्राहकाने ही लिंक ओपन केल्याने ही फसवणुक झाली असून, मोबाईलवर हे अॅप्लीकेशन ओपन होताच ग्राहकाच्या बँक खात्यातील व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भामट्यांनी तब्बल १५ लाख २५ हजार ५८९ रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. अवघ्या तीन ते चार दिवसात भामट्यांनी सदर बँक ग्राहकाच्या खात्यातील रोकड परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतली असून तसेच क्रेडिट कार्डवरूनही परस्पर रक्कम लांबविण्यात आली आहे.
दुसरा प्रकार दि.५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान घडला. भामट्यांनी एचडीएफसी बँकेचे ग्राहक असलेल्या दांम्पत्याची खाते परस्पर रजिस्टर नंबर बदलून तसेच अन्य मोबाईल नंबरशी जोडून ५ लाख ८४ हजार ४९० रूपयांची रक्कम लांबविली आहे. दोन्ही खात्यांशी नव्याने जोडण्यात आलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून दांम्पत्याच्या बँक खात्यातील रक्कम अन्य खात्यात वर्ग करून परस्पर काढण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास येताच दाम्पत्याने बॅकेकडे पाठपुरावा केला मात्र समाधान न झाल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून, दोन्ही घटनांप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.