नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत १० लाख ६५ हजार रूपयांची फसवणुक करण्यात आली असून मुद्दल आणि परतावा पदरात न पडल्याने गुंतवणुकदाराने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील ड्रीमसिटी भागात राहणा-या एका गुंतवणुकदाराने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात सायबर भामट्यांनी गुंतवणुकदाराशी संपर्क साधण्यात आला होता. वेगवेगळया मोबाईलधारकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदाराचा विश्वास संपादन केला. यानंतर भामट्यांनी वेगवेगळय़ा बँक खात्यात मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडण्यात आले. हा प्रकार २ ऑगष्ट ते २१ नोव्हेंबर दरम्यान घडला.
यात संशयित भामट्याच्या सांगण्यानुसार गुंतवणुकदारांने १० लाख ६५ हजार ५१९ रूपयांचा भरणा वेगवेगळया बँक खात्यात केल्याने ही फसवणुक झाली असून गुंतवणुकीसह मोबदला पदरात न पडल्याने हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.