नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी अधिकारी असल्याचे भासवून शहरातील एका बेरोजगारास भामट्यांनी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल दहा लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्ष दीड वर्षांचा कालावधी उलटूनही नोकरी अथवा पैसे पदरात न पडल्याने बेरोजगाराने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पांडूरंग पाटील (४९ रा.अक्षर पिरॅमिड,समर्थनगर पाथर्डी फाटा),बिरबा शिवाजी पाटील व ममता केनेडी नायडू अशी बेरोजगारास गंडविणा-या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत चेतन रमेश सोनवणे (२६ रा.लक्ष्मी नारायण हाईटस खंडेराव नगर) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे व पाटील एकमेकांचे परिचीत असून, त्यातून सोनवणे यांची उर्वरीत संशयितांची ओळख झाली होती. २२ एप्रिल २०२३ रोजी महामार्गावरील हॉटेल हेवन सेवन येथे संशयित थांबले होते. या ठिकाणी पाटील सोनवणे यांना घेवून गेला होता. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून भामट्यांनी हा गंडा घातला.
बेरोजगार असल्याने सोनवणे यांनी नोकरीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्याने संशयितानी त्यास सरकारी नोकरीचे आमिष दाखविले. यावेळी संशयितांनी राष्ट्रीय चिन्ह असलेल्या फार्मवर सोनवणे यांची माहिती असलेला खोटा फॉर्म भरून गेल्याने सोनवणे यांचा विश्वास बळावला. सरकारी नोकरीच्या कामाच्या मोबदल्यात दहा लाख रूपये देण्याचे ठरल्याने सोनवणे यांनी आठ महिन्यांच्या कालावधीत संशयिताशी भेट घेत पैसे अदा केले. मात्र वर्ष दिड वर्षांचा कालावधी उलटूनही नोकरी न लागल्याने तसेच संशयितांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने त्याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.