नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाव कमी जास्त करण्याच्या वादातून कपडे विक्रेत्यांनी मायलेकास बेदम मारहाण केल्याची घटना शालिमार येथील नेपाळी कॉर्नर भागात घडली. या घटनेत धारदार वस्तू मारण्यात आल्याने ग्राहकाच्या हातास गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रज्जाक हुसेन अफताब हुसेन शेख (२४ रा.पंचशिलनगर,गंजमाळ),समीर शकिल शेख (२५ रा.बागवानपुरा), कैफ आरिफ इनामदार (२१ रा. नाईकवाडीपुरा) व रोहन मधुकर सरकाटे (२० रा.निलगीरीबाग,आडगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यावसायीकांची नावे आहेत. याबाबत अजय अशोक तांबे (५० रा. पोलीस हेडकॉर्टर) यांनी फिर्याद दिली आहे. तांबे व त्यांच्या आई रविवारी (दि.१) शालिमार भागात गेले होते. कपड्यांच्या हातगाडीवर लहान मुलांचे कपडे पसंतीस पडल्याने त्यांनी खरेदी करतांना भाव कमी जास्त केल्याने हा वाद झाला.
व्यावसायीकाने साडे चारशे रूपये सांगितलेल्या कपड्यांच्या भावात तांबे यांच्या आईने शंभर रूपये कमी केल्याने झालेल्या शाब्दीक वाद हातापायीवर आला. यावेळी संतप्त व्यावसायीकासह आजूबाजूला असलेले विक्रेतेही धावून आल्याने ही घटना घडली. तांबे यांच्यासह त्यांच्या आईला शिवागीळ करीत सदर व्यावसायीकांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हाणामारीक कुणीतरी एकाने धारदार शस्त्राने तांबे यांच्या हातास दुखापत केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी…३५ हजाराचा ऐवज चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडाळागावात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात १५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमय्या आजीज शेख (रा.आंबेडकर पुतळ््याजवळ,राजवाडा वडाळागाव) यांनी फिर्याद दिली आहे. शेख कुटूंबिय गेल्या शनिवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचे मंगळसुत्र असा सुमारे ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार डोळक करीत आहेत.
५१ हजाराचा विदेशी मद्यसाठा हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात बेकायदा मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. किरकोळ विक्रीसाठी दुचाकीवर दारूची वाहतूक करणारे दोघे पोलीसांच्या हाती लागले असून संशयितांच्या ताब्यातून सुमारे ५१ हजाराचा विदेशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव सुभाष जाधव (२८ रा.राजवाडा,वाडगाव रस्ता गिरणारे) व ध्रुवराज गोबरे विश्वकर्मा (२२ रा.उत्तरप्रदेश) अशी बेकायदा मद्यवाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पेठेनगर मार्गा वरून दुचाकीवर बेकायदा मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती इदिरानगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी (दि.१) सायंकाळी पेठेनगर रोडवरील वन लाईफ जिम समोर सापळा लावला होता. एमएच १५ डीवाय ०३०९ अडवून पोलीसांनी वाहनतपासणी केली असता संशयिताकडे सुमारे ५१ हजार ७२० रूपये किमतीचा विदेशी दारूचा साठा मिळून आला. संशयित किरकोळ विक्रीसाठी मद्यसाठ्याची वाहतूक करीत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याबाबत अंमलदार सौरभ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार फुलसुंदर करीत आहेत.