नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम व्यावसायीकांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षा पुरविली जात नसल्याने उंचावरून पडल्याने मजूर आणि कामगारांना आपला जीव गमवावा लागत असून, वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. याबाबत गंगापूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सुनिल साहेबराव इनामदार (४२ रा.शिवपुरी चौक,पंडीतनगर) हा कामगार गंगापूर रोड भागातील बांधकाम साईटवर शुक्रवारी (दि.२९) कामास गेला होता. जयहिंद सर्कल येथील साई चायनिज कॉर्नर परिसरातील सानप यांच्या साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. माती काम करीत असतांना उंचावरून पडल्याने इनामदार गंभीर जखमी झाले होते. सहका-यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
दुसरी घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. अभिमन लक्ष्मण सपकाळ (७५ रा.केळकरवाडी,सिन्नरफाटा) हे रविवारी (दि.१) रिलायन्स डिजीटल परिसरातील अष्टपद हाईटस या इमारतीत सुतार काम करीत होते. दुपारच्या सुमारास काम करीत असतांना ते जिन्यावरून तोल जावून पडल्याने जखमी झाले होते. घरमालक विनायक म्हैसधुणे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैदयकिय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक होलगिर करीत आहेत.