नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- म्हसरुळ परिसरात महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट विकून ३० टक्के परतावा मिळवून देतो, असे आमीष दाखवित एकाची ५ लाख ३६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी धीरज राजेद्र अमृतकर या संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
म्हसरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज राजेंद्र अमृतकर (वय २७, रा. अमृतकुंज, सुभाषचंद्र गार्डनजवळ, त्रिमूर्ती चौक, सिडको) याने रजत सुनील सोनवणे (वय ३०, रा. स्नेहनगर, म्हसरुळ) यांना महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट विकून ३० टक्के रक्कमेचा नफा मिळवून देतो, असे आमीष दाखवले.
या बदल्यात धीरजने रजतकडून ४ जानेवारी २०२४ ते २९ मार्च २०२४ दरम्यान वेळोवेळी इंटरनेट व मोबाइलद्वारे एकूण ५ लाख ३६ हजार ८०० रुपये उकळले. घेतलेले पैशांची परतफेड न करता आर्थिक फसवणूक झाल्यामुळे रजत सोनवणे याने सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करीत आहे.