नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टोमॅटोच्या शेतपिकात बेकायदेशीर गांजाची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुधखेड ता. चांदवड शिवारात ग्रामिण पोलीसांनी छापा टाकत अमली पदार्थाची शेती उध्वस्त केली असून, या कारवाईत शेतक-यास बेड्या ठोकत तब्बल १३ लाखांचे २१४ किलो वजनाचा गांजा नामक अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आङे. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र नामदेव गांगुर्डे (४०, रा. तपनपाडा, दुधखेड ता. चांदवड) असे अटक करण्यात आलेल्या शेतकºयाचे नाव आहे. वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपनपाडा ( दुधखेड) शिवारामध्ये गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजू सुर्वे याच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथक आणि वडनेर भैरव पोलीसांच्या फौजफाट्याने परिसर पायदळी तुडवत टोमॅटो शेतपिका आड लागवड केलेल्या गांजा शेतीचा भांडाफोड केला. घटनास्थळी संशयित देखभाल व जोपासना करतांना मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ९३ हजार ६० रुपयांचे २१५ किलों वजनाची ६५ गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशतिय गांगुर्डे यास अटक करण्यात आली आहे.
गांगुर्डे याच्याविरोधात यापूर्वी जबरी चोरीचाही गुन्हा दाखल असून, त्याने बियाने कोठून आणले तसेच गांजाचा कोणास व कशी विक्री करणार होता. याबाबत पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजू सुर्वे, वडनेर भैरवचे सहायक निरीक्षक दिनकर मुंढे, जमादार प्रकाश जाधव एलसीबीचे नवनाथ सानप, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सतिश जगताप आदींच्या पथकाने केली.
……..