नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर मार्केट ब्रोकरणे दाम्पत्यास तब्बल ४० लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखोंचा परतावा देवून भामट्याने गुंतवणुकीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार गेश आनंद काळे (रा.गणेश व्हॅली,सिन्नरफाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ब्रोकरचे नाव आहे. याबाबत तेजस साहेबराव पगार (रा.ओतूररोड कळवण) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून संशयित ब्रोकर काळे याने गेल्या मे महिन्यात पगार यांना गाठून शेअर मार्केट ट्रेडींग बाबत माहिती दिली होती. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत जादा परवा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने पगार यांनी पत्नी शरयू पगार यांच्या नावे डिमॅट अकाऊंट उघडून अल्पावधीत तब्बल एक कोटी ५ लाखाची गुंतवणुक केली.
डिमॅट खात्यावर ट्रेंडिग केल्याचे भासवून संशयित ब्रोकरने पगार दांम्पत्यास ६५ लाख ८ हजार ९९१ रूपयांचा परतावा दिला. त्यामुळे पगार दांम्पत्याचा विश्वास वाढत गेला. यानंतर मात्र परतावा अथवा गुंतवणुकीची ३९ लाख ७७ हजाराची रक्कम मिळवून देण्यात संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.