नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुढे मर्डर झाले असल्याची बतावणी करीत तोतया पोलीसांनी वृध्दाचे दागिणे हातोहात लांबविल्याचा प्रकार कोणार्क नगर भागात घडला. या घटनेत सोन्याच्या लॉकिटसह अंगठी असा सुमारे १ लाख ५ हजार रूपये किमतीचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती माधवराव चौधरी (६२ रा. श्रीराम नगर,जत्रा हॉटेल जवळ आडगाव शिवार ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी सोमवारी (दि.२५) सायंकाळी देवदर्शनासाठी परिसरातील मंदिरात गेले असता ही घटना घडली. कोणार्क नगर येथील ओंकारेश्वर गणेश मंदिरा समोरील फुटपाथने ते घराकडे पायी जात असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांनी पुढे मर्डर झाले असून तपासणी सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी भामट्यांनी अंगावरील सोन्याचांदीचे दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने चौधरी यांच्या गळ््यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी व ११ ग्रॅम वजनाची अंगठी असा सुमारे १ लाख ५ हजार रूपये किमतीचे अलंकार हातचलाखीने लांबवित पोबारा केला. अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.