नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फसवणुकीच्या गुन्हयात चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर खाज येणारी पावडर टाकून शासकिय कामात अडथळा आणणा-या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिने साधा कारावास व बारा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या घटनेत पोलीसांना दुखापत करीत वाहनाचेही नुकसान करण्यात आले होते. गणेशवाडीतील शेरेमळा भागात सन.२०१९ मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोहन पुंडलीक उशीर (२९) व संजय बापू पाटील (५१ रा.शेरेमळा,गणेशवाडी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक बैरागी यांनी फिर्याद दिली होती. बैरागी व त्यांचे सहकारी २७ जानेवारी २०१९ रोजी दुपारच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुह्याबाबत चौकशी करण्यासाठी शेरेमळा भागात गेले होते. पुंडलीक उशीर, संदिप पगारे,गौरव उशीर,सुनिल सोळसे,गुलाब तरठ,मोहन उशीर,बेबी गरड,गुलाबबाई चव्हाण व संजय पाटील आदींच्या टोळक्याने गैरकायद्याची मंडळी जमा करीत गोंधळ घातला.
याप्रसंगी मोहन उशीर याने पोलीस वाहन (सीआरमोबाईल) एमएच १५ एए ८८ हिची काच फोडून काचकुयरी नावाची खाज येणारी पावडर पोलीस पथकाच्या अंगावर टाकून शिवीगा व दमदाटी करीत शासकिय कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले व सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव यांनी केला. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१० चे न्या. डॉ.यु.जे. मोरे यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड रविद्र निकम यांनी काम पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यानी दिलेली साक्ष व तपासी अधिकाºयांनी सादर केलेले परिस्थीजन्य पुराव्यास अनुसरून मोहन उशीर आणि संजय पाटील यांना दोषी ठरवत त्यांना विविध गुह्यात शिक्षा सुनावली. तर उर्वरीत संशयितांची निर्दोष मुक्तता केली.