नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील नागचौक भागात पत्ता विचारण्याचा बहाणाकरून रिक्षाचालकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत पाटील उर्फ सेल्फी (रा.शनिचौक) व गौरव केळकर (रा.सरदारचौक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अक्षय रमेश दामोदरे (२४ रा. जोशी कॉलनी,हिरावाडी) याने फिर्याद दिली आहे. अक्षय दामोदरे व त्याचा भाऊ योगेश हे दोघे बंधू मंगळवारी (दि.१०) रात्री नागचौक भागातील उमिया सोसायटी परिसरात गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. संशयित दुकलीने दोघा भावांना गाठून तुमचा नातेवाईक गणेश मोरकर कोठे राहतो अशी विचारपूस करीत हा हल्ला केला. रिक्षाचालक अक्षय दामोदरे याने सदर व्यक्ती आमचा नातेवाईक नसून तो कोठे राहतो हे माहित नसल्याचे सांगताच दोघा संशयितांनी त्यांना शिवीगाळ केली.
यावेळी संतप्त संशयित गौरव केळकर याने तुम्हाला आता बघतोच असे म्हणत धारदार चाकू सारख्या वस्तूने अक्षयच्या डोक्यावर वार केला. यावेळी अक्षयने बचावासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता अनिकेत पाटील याने पाठलाग करीत अक्षयच्या हातावर कश्याने तरी वार करून दुखापत केली. या हल्यात अक्षयने पाटील याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने त्याच्या हातास चावा घेतला. या घटनेत अक्षय दामोदरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.