नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ व सातपूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सुरेश सोनवणे (३० रा.आशापूरा सोसा.धात्रकफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटूंबिय रविवारी (दि.२४) विवाहसोहळया निमित्त मुंबईत गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसात सोनवणे यांचे घर फोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ६० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ५८ हजार २११ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.
दुसरी घटना सोमेश्वर कॉलनीत घडली. संकठा वंशराज यादव (रा.शिवशक्ती रो हाऊस,व्यायाम शाळेजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यादव कुटूंबिय सोमवारी (दि.२५) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी यादव यांचे बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ७० हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.