नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँक ग्राहकाच्या खात्यावर भामट्यांनी ऑनलाईन डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आधार अपडेट करण्याच्या बहाण्याने ही फसवणुक करण्यात आली असून या घटनेत २ लाख ९९ हजार ९४५ रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वळती करून काढून घेण्यात आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद सुकदेव माळोदे (रा.आडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माळोदे गेल्या शुक्रवारी (दि.२२) आपल्या घरी असतांना त्यांच्याशी ७८४६८१८३०८ या मोबाईल धारकाने संपर्क साधला होता. बॅक ऑफ इंडियातून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी त्यांना आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांच्या व्हॉटसअॅपवर बँकेचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठविण्यात आली होती.
माळोदे यांनी लिंकवर बँक खात्याची आणि एटीएम कार्डची गोपनिय माहिती भरली असता ही फसवणुक झाली. अवघ्या काही तासात सायबर भामट्यांनी माळोदे यांच्या बँक खात्यातील सुमारे २ लाख ९९ हजार ९४५ रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतली असून अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.