नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परिचीत तरूणांचा वाद मिटविणे एका बांधकाम व्यावसायीकास चांगलाच महागात पडला आहे. संतप्त टोळक्याने धारदार कोयत्याने व्यावसायीकावर प्राणघातक हल्ला केला असून या घटनेत व्यावसायीक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांच्या टोळक्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मनोज आनंदराव गवई,आशू मनोज गवई,गजानन निवृत्ती दिपके व आर्यन गजानन दिपके (रा.सर्व धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत बांधकाम व्यावसायीक विशाल आत्माराम लोणकर (रा.हनुमान मंदिराजवळ,धर्माजी कॉलनी ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोणकर रविवारी (दि.२४) रात्री धर्माजी कॉलनीतील हनुमान मंदिर परिसरातून जात होते.
वाटेत संशयित मनोज गवई हा परिचीत असलेल्या नितीन तिनबोटे यास शिवीगाळ करीत होता. त्यामुळे लोणकर यानी भांडण करू नका रे असा सल्ला दिल्याने ही घटना घडली. संतप्त गवई याने अन्य साथीदारांच्या मदतीने तू मचमच करतो तुझा गेमच करतो असे म्हणत टोळक्याने लोणकर यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत दिपके पिता पुत्राने लाकडी दांडक्याने तर आशू गवई याने कोयत्याने डोक्यावर वार केल्याने लोणकर जखमी झाले असून याप्रसंगी तिनबोटे यांच्यासह लोणकर यांचे वडिल व भावासही सोडू नका अशी चेतावणी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.