नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून एकाने शहरातील वृध्दास नऊ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. नऊ महिने उलटूनही गुंतवणुक अथवा परतावा रक्कम पदरात न पडल्याने गुंतवणुकदार वृध्दाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फाल्गुन भानूभाई पटेल (४० रा.शक्ती अपा. मौनगिरी गार्डन समोर हिरावाडीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत सुनिल रघूनाथ केदार (६० रा.दत्तनगर पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित पटेल व तक्रारदार केदार एकमेकांचे परिचीत असून गेल्या फेब्रुवारी महिन्यात संशयिताने केदार यांना गाठले होते. यावेळी संशयिताने बोथरा कमॉडिटी शेअर मार्केट बाबत माहिती देत गुंतवणुक केल्यास अल्पावधीत जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखविले. केदार यांचा विश्वास बसल्याने ही फसवणुक झाली.
केदार यांनी संशयिताच्या माध्यमातून गुंतवणुक करण्याचे ठरवत २६ फेब्रुवारी आपल्या राहत्या घरात बोलावून घेत दोन लाख रूपयांची रक्कम त्याच्या स्वाधिन केली. यानंतर ३ एप्रिल रोजी पाच लाख रूपये आरटीजीएस आणि ६ मे रोजी पुन्हा दोन लाखाची रोकड संशयिताकडे सुपूर्द करण्यात आली. मात्र आठ नऊ महिने उलटूनही संशयिताने गुंतवणुक अथवा परताव्याची रक्कम परत न केल्याने केदार यानी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.